मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चाचा हिशेब मांडत ‘चहामध्ये सोन्याचा अर्क टाकता का?’ असा सवाल केला होता. ही टिका मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतली आणि वर्षा व सागर बंगल्यावरील खर्चाची मर्यादा निश्चित करून टाकली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानात चहा व खानपानावर होणारा खर्च आता मर्यादित असणार आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावरही तोच नियम लागू करण्यात आला आहे. आता दोन्ही बंगल्यांवरील खर्चाची मर्यादा वर्षाला ५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. चहापासून ते शाकाहारी-मांसाहारी जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चावरून खोचक टिका केली होती. त्याचाच हा परिणाम मानला जात आहे. ‘वर्षा बंगल्यावरील चार महिन्यांच्या जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्ट टाकते का?’ असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावर कोरोनाच्या काळात बंगला बंद असताना किती खर्च झाला याची माहिती घेतली का, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. ‘आमच्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसं येतात, त्यांच्यासाठी चहापाणी करायचं नाही का?,’ असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला होता.
वेगवेगळे कंत्राट
खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने दोन्ही बंगल्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना खानपानाचे कंत्राट दिले आहे. वर्षा निवासस्थानासाठी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटीला कंत्राट देण्यात आले आहे. तर सागर बंगल्यावरील खानपानासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.
मांसाहारी जेवण ३५० रुपयांत!
दोन्ही बंगल्यांसाठी साधारण आणि विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे. यात विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी जेवण ३२५ रुपयांत, तर मांसाहारी जेवण ३५० रुपयांत सरकारला पडणार आहे. साधारण शाकाहारी जेवण १६० रुपये, तर साधारण मांसाहारी जेवण १७५ रुपयांत पडेल.
मसाला दूध १५ रुपयांत
विशेष पदार्थांमध्ये चहा, ग्रीन टी, कॉफी सर्वांत स्वस्त असून त्यासाठी फक्त १४ रुपये कंत्राटदाराला मिळतील. तर मसाला दुधासाठी १५ रुपये दिले जाणार आहेत. सर्वांत स्वस्त पदार्थांमध्ये वेफर्सचा समावेश असून त्यासाठी कंत्राटदाराला फक्त १० रुपये मिळणार आहेत. एकूण ४४ साधारण, तर २९ विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे.
CM DYCM Bungalow Hospitality Catering Expenses