नवी दिल्ली – अनेक दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींचे फॉर्म्युले आणि निर्णय मान्य असल्याची घोषणा त्यांनी भेटीनंतर केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणनेनंतर पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठी आणि नवी जबाबदारी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, असेही पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.
लवकरच मोठी घोषणा
कॅप्टन अमरिंदर यांनी निवडणूक लढविण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेशही दिला आहे. पंजाब काँग्रेसमधील संघर्ष मिटविण्यासाठी सोनिया गांधी आणि कॅप्टन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सिद्धू यांच्याकडे पक्ष संघटनेचे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. संघर्ष मिटविण्याच्या सहमतीनंतर पक्षश्रेष्ठींकडून लवकरच प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याची शक्यता असून, त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
निवडणुकीसाठी सज्ज
दहा जनपथ रोडवरील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जवळपास दीड तास बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षांसोबत सरकारच्या विकासकामांबाबत तसेच राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे बैठकीनंतर कॅप्टन यांनी सांगितले. निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. पंजाबमध्ये पक्षाबाबत काँग्रेस अध्यक्षांच्या निर्णयाला आमचा विरोध नसले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.
सिद्धू यांच्याकडे जबाबदारी
बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग नरमल्याचे पाहायला मिळाले. पंजाब काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या घोषणेमुळे नवज्योत सिंग सिद्धू यांची नवी भूमिका सरकारमध्ये नसून प्रदेश संघटनेत असेल, हे स्पष्ट झाले आहे.
राहुल आणि प्रियंका गांधीही सक्रिय
सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपदावर सरकारमध्ये पुनरागमन करण्याचा पर्याय
फॉर्म्युल्यात होता. मात्र राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या माध्यमातून राजकीय डावपेच खेळणार्या सिद्धू यांनी नंतर पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारीसाठीचे प्रयत्न सुरू केले. सिद्धू यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सोनिया गांधी आणि कॅप्टन यांच्यात होणार्या बैठकीच्या काही तासांपूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केली. या वेळी प्रियंका गांधीसुद्धा सक्रिय होत्या.