माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ
गेल्या काही दिवसांपासून आपण चक्रीवादळाचे परिणाम पाहत आहोत. त्यामुळेच ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण तयार झाले आहे. आगामी काळात हवामान कसे राहिल, असा प्रश्न शेतकऱ्यांसह अनेकांना पडला आहे. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ… उद्यापासून स्वच्छ सूर्यप्रकाश मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच, सोमवार, १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढणार आहे.
अरबी समुद्रात क्षीण अवस्थेत उरलेले मॅन-दौंस चक्रीवादळाचे अवशेष पुन्हा विकसित होऊन येमेन-ओमान किनारपट्टीकडे मार्गस्थ होईल.
बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाब क्षेत्राची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी धास्ती बाळगू नये. सध्या प्रवासात असलेले व सध्या पाकिस्तान पर्यंत पोहोचलेले पश्चिमी झंजावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) येत्या ३-४ दिवसात काश्मीर, हिमाचल, उत्तरखंडात प्रवेशित होईल.
त्याचदरम्यान इकडे महाराष्ट्रात मॅन-दौंस वादळातील ढगाळ वातावरणाचा प्रभाव नामशेष होईल. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच सरासरीपेक्षा ५ डिग्रीने वाढलेल्या किमान तापमानात हळूहळू तेवढीच घसरण होऊन सोमवार दि.१९ डिसेंबर पासून थंडीत वाढ होऊ शकते.
आज इतकेच. वातावरणात बदल झाल्यास तसे कळविले जाईल. वरील माहिती ही केवळ हवामान साक्षरतेसाठीच समजावी.
Climate Forecast Weather Cold Cyclone Effect Maharashtra
Manikrao Khule