नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘न्यायाधीश वर्षातले २०० दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते. थोडाफार वेळ मिळतो त्यातही ते त्यांच्या कामाचाच विचार करत असतात,’ असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी केले आहे.
न्यायपालिकेला मिळणाऱ्या सुट्यांबाबत कायमच टीका होत असते. न्यायमूर्तींना इतक्या सुट्यांची गरज नसल्याचेही बोलल्या जाते. या पार्श्वभूमीवर आता देशाच्या सरन्यायाधीशांनीच टीकाकरांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका खासगी वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संदर्भात वक्तव्य केले. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि न्यायपालिकेत कॉलेजिअम पद्धतीवरून संघर्ष पाहायला मिळत असतानाच सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
‘न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात. सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे दररोज ५० ते ६० प्रकरणे ऐकतात. अनेकदा निर्णय राखून ठेवले जातात. त्यामुळे शनिवारी न्यायाधीश त्यांचे निर्णय लिहिण्यात व्यस्त असतात. रविवारी ते सोमवारची तयारी करतात.’ यावेळी त्यांनी जगभरातील इतर देशांमधील सुप्रीम कोर्टात कसे काम चालते आणि भारतातले काम कसे चालते यातला फरकदेखील सांगितला.
बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल
न्यायव्यवस्थेला स्वतंत्र ठेवायचे असेल तर बाहेरच्या प्रभावांपासून दूर राहिले पाहिजे. कॉलेजियम प्रणालीमागचे मुख्य उद्दीष्ट हे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि सुरक्षित ठेवायचे आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर तिला बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
CJI Dhananjay Chandrachud on Court Holidays and Work