नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदिरानगर बोगदा ते मुंबईनाका दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने या मार्गावरून जाणार्या सिटीलिंक बसेसच्या मार्गात पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार बदल करण्यात आलेले आहे. त्यानुसार आता या बसेस निमाणी येथून सुटल्यानंतर महामार्ग, छान हॉटेल, कमोद नगर मार्गे जाऊन पुढे लेखानगर येथून हाय वे क्रॉस करून पुढे मार्गस्थ होतील अशी माहिती सिटीलिंक प्रशासनाने दिली.
हे बदल करण्यात आलेले मार्ग
१) मार्ग क्रमांक १०७ – निमाणी ते अंबड गाव
२) मार्ग क्रमांक १०९ – निमाणी ते सिम्बोईसीस कॉलेज
३) मार्ग क्रमांक १३७ – निमाणी ते जातेगाव
४) मार्ग क्रमांक १४९ – निमाणी ते घरकुल शिवार
५) मार्ग क्रमांक २०७ – नाशिकरोड डेपो ते अंबड गाव
रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बदल
वरील मार्गावरील जाणार्या बसेसच्या मार्गात बदल करण्यात आले असून हे बदल मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील. त्याचप्रमाणे मार्गातील हे बदल केवळ निमाणी येथून जाणार्या बसेसच्या मार्गातच होतील. निमाणीच्या दिशेने येणार्या बसेसच्या मार्गात कोणतेही बदल करण्यात आले नसून सदर बसेस येताना नियमित नियोजित मार्गानेच येतील. मुख्य म्हणजे सदर बस मार्गातील बदल हे रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत लागू असतील याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी असे सीटी बस लिंक प्रशासानाने सांगितले आहे.