नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन दुचाकी चोरीस गेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल रामचंद्र नेटावटे (रा.साईवंदन अपा.बालकृष्णनगर) यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे. नेटावटे गेल्या शुक्रवारी (दि.११) रात्री तारवाला ते अमृतधाम रोडवरील विठ्ठल मंदिर परिसरात गेले होते. फुटपाथवर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ एफवाय १२६२ पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
दुसरा प्रकार सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घडली नितीन पंडीत पवार (रा.उपेंद्रनगर,अंबड लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पवार गेल्या मंगळवारी (दि.८) भाजीपाला खरेदी करण्यासाठी त्रिमुर्तीचौक परिसरात गेले होते. भाजी बाजार परिसरात रस्त्यावर त्यांनी आपली एमएच १५ जीसीएफ ०१३३ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संगम करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. प्रभाकर विठ्ठल चौधरी (रा.इच्छीमंदिर श्रमिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी यांची पल्सर एमएच १५ जेई ५५१९ गेल्या मंगळवारी (दि.८) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.