बीजिंग/ मॉस्को – रशिया, इंग्लंड आणि चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, हवाई वाहतूक बंद करण्यात आले आहे. महामारीला नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र सलग पाचव्या दिवशी नवे रुग्ण आढळत असल्याने येथील चिंता वाढली आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होण्यास पर्यटकांचा एक समुह जबाबदार असल्याचा आरोप चीनच्या पर्यटन प्राधिकरणाने केला आहे. रशियामध्ये २४ तासांच एक हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, महामारी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे.
रशियामध्ये कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटच्या सबव्हेरिएंटची बाधा झाल्याचे रुग्ण आढळत आहेत. हा व्हेरिएंट पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संक्रामक आणि घातक असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडमध्ये AY.4.2 या सबव्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. चीनच्या उत्तर आणि वायव्य प्रांतातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगोलियामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने कोळशाच्या आयातीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोळशाच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे, असा इशारा चीनच्या ग्लोबल टाइम्सकडून देण्यात आला आहे. चीनमध्ये गुरुवारी १३ रुग्ण आढळले आहेत.
नवे रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने देशात पुन्हा नव्याने प्रतिबंध वाढविले आहेत.
पर्यटकांमधील एका ज्येष्ठ दांपत्यामुळे संसर्ग वाढल्याचे सांगितले जात आहे. हे दांपत्य शांघाई येथून गांसू प्रांतातील सियान आणि मंगोलिया येथे गेले होते. या दांपत्याच्या संपर्कात आलेले नागरिकच कोरोनाबाधित आढळत आहेत. स्थानिक पातळीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच येथील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. संसर्ग झालेल्या परिसरातील शाळा आणि मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.
मॉस्कोत आठवडाभर लॉकडाउन
रशियामध्येही कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना पगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनाही घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने, बार, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद असतील, असे मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेतील सुपरमार्केट आणि मेडिकल सुरू राहणार आहेत.
मृतांचा वाढला आकडा
रशियामध्ये बुधवारी २४ तासांत कोविडमुळे १,०२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महामारीच्या सुरुवातीपासून एका दिवसातील हा आकडा सर्वाधिक आहे. रशियामध्ये महामारीमुळे आतापर्यंत एकूण २,२६,३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत नॉन वर्किंग विक सुरू करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत देशात लॉकडाउन लावण्याचे आदेश पुतिन यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी अधिक धोका असेल तिथे आणखी कठोर उपाययोजना राबविण्याचे आदेशही पुतिन यांनी दिले आहेत.