हाँगकाँग – जगभरात कोरोना महामारीचा प्रसार केल्याच्या आरोपांनंतर चीनमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. चीनच्या एका अणुप्रकल्पातून एका आठवड्यापूर्वी गळती झाल्याची तक्रार समोर आली आहे. ही गोष्ट चीनने बाहेर उघड होऊ दिली नाही. असे वृत्त समजल्यानंतर सरकार चीनच्या गुआंगदोंग प्रांताच्या ताइशन शहरातील अणुऊर्जा प्रकल्पावर नजर ठेवून असल्याचे हाँगकाँगच्या एका नेत्याने सांगितले.
ताइशन शहराची लोकसंख्या जवळपास १० लाख असून, येथील अणूऊर्जा प्रकल्प हाँगकाँगपासून १३५ किलोमीटर दूर आहे. ताइशनमधील लोकांवर गळतीचा धोका अद्यापही आहे. या घटनेच्या भयावहतेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्लॅंटच्या काही ऑपरेटरांनी काही माहिती दिली. परंतु अणूऊर्जा प्रकल्पातून वायूगळती झाली आहे किंवा नाही याबाबत त्यांच्या माहितीच्या आधारावर सांगितले जाऊ शकते असे तज्ज्ञांनी सांगितले. सीएनएनच्या वृत्तामध्येही अणूऊर्जा प्रकल्पातून गळती झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ताइशन प्रकल्पात डिसेंबर २०१८ मध्ये व्यावसायिक कामे सुरू करण्यात आली होती. अणूप्रकल्पाबाबत कोणतीही चिंताजनक स्थिती नाही, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. विकिरण स्तरात कोणतीही असामान्य स्थिती दिसलेली नाही. चीनच्या अणूऊर्जा प्रकल्पात झालेली गळती उघड झाल्यानंतर आता एक नवी माहिती समोर आली आहे.
या प्रकल्पातील जनरल न्यूक्लिअर पावर ग्रुप या चिनी कंपनीसोबत भागीदार असलेली फ्रान्सची वीज कंपनी ईजीएफने स्पष्ट केले की, या प्रकल्पात काही अज्ञात वायू असल्याची माहिती मिळाली होती. ताइशनच्या अणुभट्टी क्रमांक १ मधून असामान्य वायूंची घनता वाढल्याने गळती झाली आहे, असे फ्रान्सच्या वीज कंपनीचे म्हणणे आहे.
या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली असून अधिकृत माहितीसाठी आम्ही चीनच्या संपर्कात आहोत असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अणूऊर्जेबाबत देखरेख ठेवणार्या संस्थेने सांगितले. अमेरिकेने संभाव्य विकिरणाच्या धोक्याचा इशारा दिला होता. वायू गळतीनंतर फ्रान्सच्या कंपनीच्या मागणीनुसार अमेरिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.