अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजची बालके हे उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी ही पालकांबरोबरच समाजातील प्रत्येकाची आहे. बालकांचे संरक्षण व हक्क मिळवून देण्याबरोबरच बालस्नेही जिल्ह्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने, अभ्यासूवृत्तीने व अधिक संवेदनशिलपणे काम करण्याच्या सुचना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसिबेन शहा यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव उदय जाधव, सदस्या ॲङ प्रज्ञा खोसरे, सायली पालखेडकर, ॲङ जयश्री पालवे,ॲङ संजय सेंगर, ॲङ निलिमा चव्हाण, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अधीक्षक माधवी भोसले, परिविक्षा अधिकारी कल्पना खंबाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) मनोज ससे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुसिबेन शहा म्हणाल्या की, बालकांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याबरोबरच कायद्यांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे. सर्व विभागांनी बालकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक बालकांना व्हावा, यादृष्टीने कृती आराखडा करत विविध कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. समाजातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला आहे. या कायद्याची सर्वसामान्यांमध्ये व्यापक स्वरुपात जागृती करण्याचे निर्देशही श्रीमती शहा यांनी यावेळी दिले.
स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे. ऊसतोड कामगार, वीटभट्टयांवर काम करणारे यासह स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांसाठीही शासनाच्या असलेल्या योजनांव्यतिरिक्त इतर काही योजना राबविता येतील काय याबाबत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करुन या बालकांसाठीही नाविन्यपूर्ण योजना राविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तसेच शिंगणापूर या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी अनेक बालके पान, फुल विक्री करताना आढळून येतात. या बालकांचेही संरक्षण होऊन त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी संस्थांनशी संपर्क साधून ही ठिकाणे बालस्नेही होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही अध्यक्षा सुसिबेन शहा यांनी यावेळी दिल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Child Right Commission Chairman on Shirdi Child Labour