मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात स्थापन झालेल्या सरकारला आता महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तो नेमका का होत नाही, त्यामागे काय कारण आहे याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, आज यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यासंदर्भात आज माध्यमांनी विचारले असता शिंदे म्हणाले की, थोडा विलंब जरुर झाला आहे पण कुठलाही वाद नाही. येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार करु. यासंदर्भात कोणताही भेदभाव केला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौरा रद्द का करावा लागला, याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे चार वेळा दिल्लीला गेले आहेत, यातल्या बहुतेकवेळा ते मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले गेले आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एका महिन्यापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे. तसंच त्यांच्या शपथविधीलाही दोन दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येकवेळी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगण्यात येत आहे, पण याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
विरोधकांनीही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे टीका केली आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे कोणत्याच जिल्ह्याला पालकमंत्री नाही. तसंच सरकारकडून मदत पोहोचत नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुख्य म्हणजे विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशनही अजून झालेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या भवितव्याबाबतची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही ? असा प्रश्नही विचारला जात आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच अतिवृष्टी व पूरामुळे शेतजमिन आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/KJycVAcvOc
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 25, 2022
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. आज त्यांचा दिल्लीत मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दिल्लीला गेले आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चार वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते 1 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती, जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसऱ्यांदा 8 जुलै रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अभित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा ते 18 जुलै रात्री दिल्लीला रवाना झाले. यानंतर 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.
महाराष्ट्रातील विविध भागात पूर परिस्थिती आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नाशिक असा अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. @Jayant_R_Patil pic.twitter.com/2zDS9vAowI
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 28, 2022
मंत्रिमंडळाची काल म्हणजेच बुधवारची बैठकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच उपस्थितीत झाली. नवीन सरकार आल्यानंतरची ही चौथी बैठक होती. पहिली बैठक शपथविधीच्या दिवशी म्हणजे दि. ३० जूनला झाली होती. त्यानंतर दि. १४ आणि १६ जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती. दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून राज्यातील जनता वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Chief Minister Eknath Shinde on Cabinet Expansion Politics