मुंबई नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वादाची दखल अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी भुजबळ यांनी हडपल्याबाबत कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कांदे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालतही आव्हान दिले आहे. तसेच, भुजबळ यांच्यावर विविध आरोपही कांदे यांनी केले आहेत. तसेच, भुजबळांवरील आरोप मागे घ्यावेत यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कडून धमकी आल्याची तक्रारही कांदे यांनी केली आहे. हे सर्व प्रकरण राज्य पातळीवरच गाजले आहे. आता याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कांदे यांनी पुराव्यानिशी पत्र दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधी आणि त्याच्या वाटपासह विकास कामांची संपूर्ण जंत्रीच मागविली आहे. सर्व प्रशासकीय कागदपत्रे त्वरीत सादर करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या सर्व कागदपत्रांची युद्धपातळीवर पूर्तता केली जाणार आहे.
कांदे हे नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. तर, भुजबळ यांचे पुत्र पंकज हे यापूर्वी नांदगावचे आमदार होते. आपल्या मतदारसंघाला विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसून भुजबळ हे कंत्राटदारांमार्फत निधी लाटत असल्याचा कांदे यांचा आक्षेप आहे. भुजबळ यांची पालकमंत्रीपदावरुन गच्छंती करावी, अशी मागणीही कांदे यांनी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्रे सुपूर्द होत असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.