विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
चारधाम करु इच्छिणाऱ्यांसाठी गोड बातमी आहे. देशाच्या चारही दिशांना असलेले हे धाम वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वाहनांद्वारे चारधाम यात्रा करावी लागते. मात्र, हीच यात्रा केवळ एकाच रेल्वेतून झाली तर? हो, हे आता शक्य होणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांना सहकुटुंब ही यात्रा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे चार धाम यात्रा रद्द करण्यात आली. तथापि भारतीय रेल्वे लवकरच यात्रेकरू आणि पर्यटकांच्या सोयीसाठी एक विशेष रेल्वे सेवा सुरू करणार आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी पवित्र तीर्थक्षेत्र बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम आणि द्वारकाधीश या चार धामला जाईल. याचा फायदा कोट्यावधी पर्यटकांना होणार आहे.
चारधाम यात्रेदरम्यान भाविकांना मोठा आनंद मिळेल असा विश्वास रेल्वेला आहे. ही सेवा श्री रामायण यात्रा सेवा यशस्वी झाल्यानंतर करण्यात येणार आहे. या विशेष रेल्वे प्रवासाला ‘देखो अपना देश’ असे नाव देण्यात आले आहे. या सेवेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे पर्यटनाला चालना देणे आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. चार धाम रेल यात्रा ही १६ दिवसांची असेल. ही यात्रा येत्या १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या यात्रेकरिता नवी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून प्रवास सुरू करता येईल. या प्रवासादरम्यान ही गाडी तीर्थक्षेत्र बद्रीनाथ, गोल्डन बीच पुरी, कोणार्क मंदिर, चंद्रभंगा बीच, रामेश्वरम आणि द्वारकाधीशला जाईल. यासह शिवराजपूर बीच, धनुष्कोडी, नागेश्वर ज्योतिर्लिंगा येथेही भाविक भेट देऊ शकतात. पर्यटकांच्या सोयीसाठी क्रूझमध्ये केटरिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
एकाच सहलीमध्ये केवळ १२० पर्यटक चार धाम येथे जाऊ शकतील. तथापि, या ट्रेनमध्ये १५६ पर्यटकांची प्रवासी क्षमता आहे. चारधाम यात्रेसाठी प्रत्येक व्यक्तीला ७८ हजार ५८५ रुपये एवढे भाडे निश्चित करण्यात आले आहे. या भाड्यात केटरिंग आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. या प्रवासादरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर्सही भारतीय रेल्वेकडून देण्यात येतील.
गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त अयोध्याच्या शरयू नदीत ‘रामायण क्रूझ सेवा’ सुरू करण्यात आली होती. या प्रवासा दरम्यान संत गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित मर्यादा पुरुषोत्तम यांचा चरित्रपट दाखविला. यात भगवान रामाच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतची कथा दर्शविली गेली आहे. त्याचबरोबर यात्रा संपल्यानंतर आरती आयोजित केली जाते, त्यामध्ये सर्व पर्यटक सहभागी होऊ शकतात.