चांदवड : चांदवड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकरी हे कांदा उत्पादन घेत असून कांदा काढणीच्या वेळीच पाऊस आल्यामुळे कांद्याचे पीक शेतातच सडून जाईल याची भीती आता शेतकरी वर्गाला आहे. तसेच द्राक्ष पीक हे चांदवड तालुक्यातील संपूर्ण तालुक्यात घेतले जात असून सर्वच गावांमध्ये याचा चांगलाच वाईट दुष्परिणाम दिसून येणार आहे. ऐन फुलोऱ्यात असलेले द्राक्ष बाग यांना कुजण्याची भीती व पाणी उतरत असलेल्या बागांमध्ये द्राक्षाला तडे जाण्याची भीती आहे.
याच बरोबर वीटभट्टी लावणारे व्यावसायिक यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.भट्टी लावण्या अगोदरच तयार केलेली वीट ही विरघळली असल्याने यांनाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. तसेच चांदवड तालुक्यात कोकणखेडे येथे धोंडीराम प्रकाश गाडे यांच्या २३ मेंढ्या मयत झाल्या असून मेसंखेडे येथे ज्ञानेश्वर ठोंबरे , दत्तू नरोटे, गणेश ठोंबरे यांच्या देखील ०७ मेंढ्या ०३ कोकरं यांचाही या अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेला आहे यामुळे संबंधित शासकीय यंत्रणा ठिकाणी पंचनामा करत असून याची नोंद शासनाने घेऊन शासन स्तरावरून मदत मिळावी यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी अशा शेतकरी वर्गाला लागली आहे.