चांदवड- अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाईपासून चांदवड तालुका वंचित राहिला आहे. चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी चांदवडच्या प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सततचा पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा,मका,सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही त्यांना कुठलीच नुकसानभरपाई मिळालेली नाही व कुठलेच पंचनामे देखील झाले नाही. चांदवड तालुका नुकसानीच्या अनुदानापासून वंचित ठेवता येणार नाही ,असे होणार असेल तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयात आंदोलन करू असे निवेदन निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर ,राजू पाटील,तळेगावरोही,भाऊसाहेब पवार विटावे,विक्रम ठाकरे साळसाणे,समाधान ठाकरे साळसाणे तसेच तळेगाव रोही ,सळणासाणे ,वाघदर्डी,वाद वराडी आदी ठिकाणचे शेतकरी उपस्थित होते.