इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी एका नीतीशास्त्राची रचना केली आहे. यामध्ये त्यांनी धन, संपत्ती, स्त्री, मित्र, करिअर आणि दांपत्य जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल विश्लेषण केले आहे. चाणक्य यांनी आपल्या धोरणांद्वारे समाजाला मार्गदर्शन केले आहे. जी व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या नीतींचे अनुकरण करते, ती आपल्या जीवनात प्रगती करते असे मानले जाते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्रात व्यक्तीचा अपमान करणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टी व्यक्तीला कधी ना कधी त्याच्या आयुष्यात अपमानित करत असतात, त्या कोणत्या आहे हे आपण जाणून घेऊया.
अज्ञान
आचार्य चाणक्य श्लोकाच्या माध्यमातून सांगतात, माणसाला आपल्या जीवनात अज्ञानामुळे अनेक वेळा अपमान सहन करावा लागतो. एखादा व्यक्ती अज्ञानी आणि मूर्ख असेल तर नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नसतो. त्यामुळे त्यांचा अपमान होतो. आपल्या मुर्खपणामुळे अनेक वेळा व्यक्ती असे काहीतरी करतात ज्याच्यामुळे त्याला अपमानित व्हावे लागते.
क्रोध
आचार्य चाणक्य सांगतात, तरुणपणी माणसामध्ये खूप जोश असतो. अशा अनेक परिस्थितींमध्ये माणूस आपला राग नियंत्रणात ठेवू शकत नाही. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागावर नियंत्रण नसल्यास माणूस नकळत अनुचित काम करतो. कधीकधी तो आपला मार्गही भटकू शकतो. त्यामुळे समाजात त्याला मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळू शकत नाही. त्यामुळे तरुणपणात माणसाला आपली ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करावी, ज्यामुळे माणसाचे नुकसान होऊ शकणार नाही.
परावलंबी
चाणक्य सांगतात, की जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते, तिला आपल्या जीवनात प्रत्येकवेळी अपमानित व्हावे लागते. कारण ती व्यक्ती आपल्या जीवावर काहीच करू शकत नाही. तिला प्रत्येक कामात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. त्यामुळे तिला समाजात अनेक वेळा अपमान सहन करावा लागतो.