मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला 6 लाख 70 हजार 150 रुपये किमतीच्या 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यावर्षी म्हणजेच 2022-23 मध्ये 33 हजार 774 अर्ज प्राप्त झाले असून यासाठी 184 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य राजेश एकडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांनी विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 1 हजार 178 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 1 हजार 94 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र होते. पात्र अर्जापैकी आतापर्यंत 912 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला गेला असून उर्वरित 182 विद्यार्थ्यांना 31 मार्च पूर्वी या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.
Chalisgaon Illegal Rice Stock Seized Action Assembly