विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्र सरकारमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे केंद्रीय नोकर भरतीसाठी आता समान पात्रता परीक्षा अर्थात सीईटी द्यावी लागणार आहे. ही सीईटी पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे. त्यामुळे ही सीईटी देण्यासाठी इच्छुक असाल तर आताच कामाला लागावे लागेल.
केंद्र सरकारच्या नोकरीत भरती करण्यासाठी उमेदवारांची पडताळणी आणि छाननी करण्याकरता अशी परिक्षा घेण्याचा पहिलाच अनोखा उपक्रम पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पुढाकाराने या वर्षीच्या अखेरीला घेण्याचे नियोजन होते. परंतु कोविडमुळे याला विलंब होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी यादी-२०२१ च्या ईबूकचे नॉर्थ ब्लॉक इथे आज त्यांनी प्रकाशन केले. नोकरीसाठी इच्छुक तरुणांची सहजतेने निवड करण्याच्यादृष्टीने समान पात्रता परिक्षा ही कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने केलेली पथदर्शी सुधारणा आहे.
तरुणांसाठी विशेषत: दुर्गम भागात राहणाऱ्यांकरता ही वरदान ठरेल असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. ही क्रांतीकारक सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणांप्रती असेलेली तीव्र संवेदनशीलता, देशभरातील तरुणांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठीची तळमळ याचे प्रतिबिंब आहे असेही ते म्हणाले.