नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेदरम्यान बुधवारी झालेल्या समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एका राजकीय प्रश्नामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि एकच गोंधळ उडाला. यावर सीबीएसईने स्पष्टीकरण दिले असून, संबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत २००२ रोजी झालेली मुस्लिमविरोधी दंगल कोणत्या पक्षाच्या कार्यकालात झाली, असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न अनुचित आणि दिशानिर्देशांविरुद्ध असून, या प्रकरणात जबाबदार व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सीबीएसईने म्हटले आहे.
सीबीएसईने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, बुधवारी बारावीच्या समाजशास्त्राच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न योग्य नाही. तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासंदर्भात सीबीएसईच्या दिशानिर्देशांचे हे उल्लंघन आहे. ही त्रुटी सीबीएसईने मान्य केली असून, जबाबदार व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
प्रश्नपत्रिका सेट करणार्या तज्ज्ञांना सीबीएसईने दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार, फक्त आणि फक्त अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जावेत. कोणतीही जात, धर्माविषयी तटस्थ असावे, सामाजिक आणि राजकीय आवडीच्या आधारावर नागरिकांच्या भावना दुखावणारे प्रश्न विचारले जाऊ नये.
समाजशास्त्र परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आला. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेला मोठ्या प्रमाणातील मुस्लिम विरोधी हिंसाचार कोणत्या सरकारच्या कार्यकाळात झाला होता? उत्तरासाठी काँग्रेस, भाजप, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले.