मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्यांकडून पैसे कसे उकळू शकतो. त्याचे उत्तम उदाहरण मुंबई विमानतळावर समोर आले आहे. कस्टम विभागातील अधिकाऱ्याने विदेशातून आलेल्या प्रवाशाला डांबून ठेवले. कारवाईचा धाक दाखवत २ मिनिटांत ३५ हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर प्रत्येक मिनिटासाठी ५ हजार वाढत जातील, अशी तंबीही दिली. प्रवाशाने घाबरून ३० हजार रुपये दिले. या प्रकरणात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
दुबईहून आलेल्या प्रवाशाच्या गळ्यात सोन्याची चेन होती. मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्याने त्याला रोखले. कुणीही नसलेल्या ठिकाणी घेऊन गेला. तुझ्या गळ्यातली सोन्याची चेन अवैधरीत्या आणली असल्याचे आणि त्याचे शुल्क भरावे लागेल, असे ठणकावून सांगतले. प्रवाशाने गयावया करीत ही चेन वैयक्तिक वापरासाठी आणली आहे. त्याची पावतीही आपल्याकडे आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये असून नियमानुसार शुल्क भरण्यास तयार असल्याचेही सांगितले. अधिकाऱ्याने तब्बल ५५ हजार रुपयांचे शुल्क आणि दंड भरावे लागणार असल्याचे सांगितले.
दीड तास खोलीत डांबले
प्रवाशाच्या तक्रारीनुसार त्या अधिकाऱ्यांना त्याला एका रुममध्ये दीड तास बसवून ठेवले. तू तस्करी केली आहेस. तुला मोठी शिक्षा भोगावी लागेल. असे सांगत तो अधिकारी बराच वेळ गायब झाला होता. परत येऊन शुल्क भरण्याची गरज नाही. त्याचे मी बघतो. पण इथून बाहेर पडायचे असेल तर ३५ हजार रुपये आत्ता कॅशमध्ये द्यावे लागतील अशी बतावणी केली.
गुगलपेवर स्वीकारली रक्कम
प्रवाशाने ऐवढी रक्कम रोख स्वरुपात नसल्याचे सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने दोन नंबर देऊन त्यावर जीपे करण्यास सांगितले. २ मिनिटांत पैसे दे, नाहीतर पुढच्या प्रत्येक मिनिटासाठी ५ हजार जास्त भरावे लागतील, असा इशाराही दिला. प्रवाशाने एका नंबरवर १७ हजार तर दुसऱ्या नंबरवर १३ हजार रुपये पाठविले.
CBI Raid Custom Officer Mumbai Airport