इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कृषी मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारत असल्याच्या आरोपावरून एका कृषी अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने विशाखापट्टणम येथे ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने या अधिकाऱ्याच्या घरी केलेल्या छापेमारीदरम्यान १ कोटी ८६ लाख रुपये आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. या अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी करणाऱ्या अन्य तीन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडांची रोपे, तसेच अन्य कृषी माल बोटीद्वारे परदेशात पाठविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येते. मालाच्या गुणवत्तेसंदर्भात हे प्रमाणपत्र जारी केले जाते. कृषी मंत्रालयाच्या विशाखापट्टणम येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आर. पद्म सिंग या अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र जारी करण्याचा कार्यभार होता.
महाराष्ट्रामध्ये फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि निर्यातीत देखील महाराष्ट्र अग्रेसर आहे. जागतिकीकरण आणि जागतिक व्यापार संघटनेतील तरतुदींमुळे कृषी मालाच्या विक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली असून कृषी मालाच्या आयात-निर्यातीच्या संधी वाढलेल्या आहेत. देशातील सुमारे 72.16 लाख हेक्टर क्षेत्रफळ कृषी माल लागवडीखाली आहे. कृषी माल निर्यातीसाठी कृषी विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
राज्याला व्यापारासाठी बॉम्बे पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यासारखे दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे समुद्री पोर्ट उपलब्ध असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासारखे आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहेत. उपलब्ध साधनसामग्रीचा आणि उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करता महाराष्ट्रातून कृषी मालाच्या निर्यातीस मोठा वाव आहे. महाराष्ट्र राज्य कृषी मालाच्या निर्यातीत देशात अव्वल स्थानावर असून या वर्षामध्ये महाराष्ट्रातून फळे-भाजीपाला इतर शेतमाल आणि प्रक्रिया पदार्थ यांची निर्यात सुमारे 200 लाख मे.टन झाली होती. तर या निर्यातीतून सव्वा लाख कोटींचे परकीय चलन प्राप्त झाले.
कृषी मालाच्या गुणवत्तेशी संबंधित असे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी हा अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करत असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली. दरम्यान, एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना पद्मसिंग याला अटक करण्यात आली. पद्मसिंग याची विशाखापट्टणम येथे तीन घरे असून, या तीनही घरांवर सीबीआयने शनिवारी छापेमारी केली. यापैकी एका घरातून १ कोटी २९ लाख रुपयांची रोकड सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. तर दुसऱ्या घरातून ५६ लाख रुपयांची रोकड सीबीआयने जप्त केली.
CBI Raid Agriculture Officer Arrested 1 crore Bribe