मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने मोठी कारवाई केली आहे. सीमा शुल्क विभागाच्या पाच अधीक्षकांना आणि कस्टम हाऊस एजंट्सना (खाजगी व्यक्ती) सहा वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासादरम्यान अटक केली आहे. या कारवाईमुळे सीमा शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सीबीआयने सीमा शुल्क विभागाच्या मुंबईतील सहा अधीक्षक आणि दोन कस्टम हाऊस एजंट्स आणि इतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सहा वेगवेगळी प्रकरणे दाखल केली आहेत. त्यांच्यावर असा आरोप आहे की या सरकारी कर्मचाऱ्यांनी कस्टम हाउस एजंट्ससोबत वेगवेगळ्या कालखंडात युबी केंद्र, जवाहरलाल नेहरू सीमा शुल्क विभाग इथे नेमणुकीस असताना संगनमत करून सीमा शुल्क कायद्याअंतर्गत “निवासाच्या ठिकाणात बदल” करण्याच्या तरतुदींचा गैरवापर केला.
या टोळीवर असा आरोप आहे की, या टोळीने परदेशात, खास करून आखाती देशांत, दोन वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य केलेल्या विविध लोकांचे पारपत्र वापरून घरगुती वापराच्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर अज्ञात वस्तू त्यांच्या बाजारभावापेक्षा कमी मूल्य दाखवून आणि काही वस्तूंच्या आत वस्तू लपवून आयात केल्या. या आरोपींवर असा आरोप आहे की अशा प्रकारे आयात केलेल्या वस्तू ज्या व्यक्तीचे पारपत्र वापरले आहे त्या व्यक्तीसाठी आयात करणे गरजेचे होते. मात्र या वस्तू इतर अनेक लोकांच्या नावाने आयात केल्या होत्या, जे अजूनही परदेशात राहतात. पारपत्रधारक व्यक्तींना त्यांचे पारपत्र वापरू देण्यासाठी १५ हजार रुपये देण्यात आले होते, असा देखील आरोप आहे.
ज्या वस्तूंची आयात करण्यात आली आहे, त्यांची निर्यात अशा व्यक्तीसाठी व्हायला हवी होती, ज्यांचे पारपत्र सीमाशुल्क विभागासमोर सादर करण्यात आले होते, मात्र तसे न होता, हा माल, देशाबाहेर स्थायिक झालेल्या आणि अजूनही देशाबाहेर राहणाऱ्या इतर लोकांच्या नावाने आयात करण्यात आला आणि ज्याचे पारपत्र या अवैध निर्यातीसाठी वापरण्यात आले, त्याला त्या बदल्यात १५ हजार रुपये देण्यात आले असाही आरोप आहे.
या संबंधित मालाची वाहतूक करणाऱ्या आणि या मालाची तपासणी/ना हरकत प्रमाणित करत, त्यांची सोडवणूक करणाऱ्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन, एकत्रितपणे (टोळीच्या माध्यमातून) ही अवैध वाहतूक करण्यात आली, असा आरोप आहे. ही अवैध वाहतूक होऊ देण्यात मदत करण्यासाठी या सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सुमारे २.३८ कोटी रुपयांची कथित लाच देण्यात आली.
या आरोपीशी आणि त्याच्या सोबतच्या लोकांशी संबंधित, १९ जागांवर छापे आणि शोधमोहीम करण्यात आली. मुंबई, दिल्ली, गाझियाबाद, जयपूर, मोतिहारी (बिहार), कुरुक्षेत्र आणि रोहतक अशा ठिकाणी झालेल्या या शोधमोहिमेत, विविध कागदपत्रे/वस्तू जप्त करण्यात आल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज रायगड जिल्ह्यात अलिबागच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.