मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ने पुण्यातील एका कंपनी सहाय्यक निबंधकाला ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून अटक केले. आरोपीने मुंबईतील एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडे या रकमेची मागणी केली होती. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने सापळा रचत या सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सीबीआयने आरोपी सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील कंपनी निबंधक कार्यालयाने मुंबईतील खाजगी कंपनीबाबत सुरू केलेल्या चौकशीच्या संदर्भात आरोपींनी लाच मागितल्याची तक्रार या खाजगी कंपनीच्या माजी संचालकाने केली होती.
या तक्रारीच्या आधारे कंपनीचे सहाय्यक निबंधक तसेच निरीक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली. आरोपीने २ ऑगस्ट रोजी कंपनी कायदा २०१३ च्या U/s. २०६(४) कलमाखाली या खाजगी कंपनीविरोधात आदेश जारी केल्याचा आरोप आहे. आरोपींने २७ ऑगस्ट रोजी पुन्हा समन्स जारी केले ज्यामध्ये लेखा परीक्षक, सर्व संचालक आणि तक्रारदाराच्या कंपनीचे माजी संचालक यांना ५ सप्टेंबर रोजी त्याच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते. या समन्सचे पालन करताना, तक्रारदाराच्या कंपनीचे कंपनी सचिव आणि त्यांच्या सनदी लेखापालांनी आरोपी कंपनी सहाय्यक निबंधकाची( AROC), पुणे येथे भेट घेतली. तेव्हा आरोपीने या प्रकरणात तक्रारदाराच्या कंपनीला तात्काळ अनुकूलता दाखवण्यासाठी अप्रत्यक्षपणे लाच मागितली.
सुरू असलेल्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या कंपनीची बाजू घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आरोपींना कंपनी सचिवांनी बोलावले, असा आरोप पुढे करण्यात आला. त्यानंतर, संशयित आरोपी कंपनी सहाय्यक निबंधकाने २३ सप्टेंबर रोजी खाजगी कंपनीच्या संचालकांना सर्व संचालकांना मोठा दंड आणि खटला भरावा लागेल, अशी धमकी दिली.याबाबत आरोपही करण्यात आला की,दंडाची मोठी रक्क्कम आणि खटल्याच्या भीतीमुळे, कंपनी सचिवांनी संशयित आरोपीच्या मागणीबाबत वाटाघाटी केल्या. यानंतर ही मागणी कमी करून ५ लाख रुपये केली. संबंधित संशयित आरोपींकडून लाच देण्याची वारंवार मागणी होत होती, त्यामुळे तक्रारदाराच्या कंपनीला ७ ऑक्टोंबर रोजी कंपनी सचिवांमार्फत आरोपींना ३ लाख रुपये देण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर संशयित आरोपीने चौकशीचे आदेश जारी करण्यापूर्वीच उर्वरित २ लाख रुपयांची लाच देण्याची मागणी केली.
यानंतर वाटाघाटीनंतर संशयित आरोपीने लाचेची मागणी वाढवून ती ६ लाख रूपये केली आणि उर्वरित रक्कम २ लाखांऐवजी आता तीन लाख रूपये लाच द्यावी,अशी मागणी केली. या प्रकरणात सीबीआयने सापळा रचला आणि सदर संशयित आरोपीला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून त्याच्या पुणे येथील कार्यालयात ३ लाख रुपयांची उर्वरित लाच मागताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपीला अटक करून सीबीआय, मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीशांनी आरोपीला १९ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.