नवी दिल्ली – विमानात प्रवास करण्याचे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य माणूस अनेक दिवस पैशांची बचत करतो. पण कोणी हे स्वप्न आपल्या कुत्र्यासोबत पूर्ण केले असा विचार तुम्ही करू शकता का? एका व्यक्तीने आपल्या कुत्र्यासाठी विमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. संबंधित व्यक्ती कुत्र्याला घेऊन मुंबईहून चेन्नईला पोहोचल्यानंतर सर्वच लोक अचंबित झाले होते.
ही घटना एअर इंडियाच्या विमानात घडली. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, मुंबईहून चेन्नईपर्यंत एका कुत्र्याने आपल्या मालकासोबत बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला. त्याच्या मालकाने या प्रवासासाठी एकूण अडीच लाख रुपये खर्च केले. हा विमानप्रवास दोन तासांचा होता. संबंधित व्यक्तीला आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन चेन्नईला जायचे होते. त्यामुळे त्याने संपूर्ण बिझनेस क्लासच बुक केला. पांढ-या रंगाचा कुत्रा बुधवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानात बसला. या विमानाच्या बिझनेस क्लासच्या केबिनमध्ये १२ सीट होते. कुत्र्याने बिझनेस क्लासमध्ये ऐश आरामात प्रवास पूर्ण केला. मुंबई-चेन्नई बिझनेस क्लासचे २० हजार रुपये भाडे आहे. जेव्हा मालक कुत्र्यासह विमानात पोहोचला तेव्हा त्यांचे क्रू मेंबर्सनी जंगी स्वागत केले.
याआधी पाळीव प्राण्यांनी एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला आहे. एका मालकाने पाळीव कुत्र्यासह एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून बंगळुरूहून दिल्लीपर्यंत प्रवास केला आहे. परंतु एका पाळीव प्राण्यासाठी संपूर्ण बिझनेस क्लासच बुक केल्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रवासाबाबत अनेकांनी मालकाचे कौतुक केले. काही लोकांनी माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीबाबत हे खरे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाच्या विमानात कमीत कमी दोन पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्याची परवानगी आहे. नियमांनुसार पाळीव प्राण्यांना बुक केलेल्या क्लासच्या शेवटच्या रांगेत बसवले जाते. परंतु संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून संबंधित व्यक्तीने कमालच केली.