नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेड इन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच स्वदेशी 4G नेटवर्क आणणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानेही त्यांच्या दोन हजारांहून अधिक स्थळांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, BSNL येत्या काही आठवड्यात स्वदेशी 4G नेटवर्क सुरू करणार आहे. यासाठी भारतभरात 2,343 ठिकाणे ओळखण्यात आली असून, मंत्रिमंडळाने त्यांना या कामासाठी परवानगी दिली आहे. अभियंते आणि शास्त्रज्ञ हे 4G टेलिकॉम नेटवर्क भारती विकसित करत असून स्वदेशी 4G नेटवर्क आणण्याच्या योजनेअंतर्गत, BSNL भारतभर 1.12 लाखांहून अधिक टॉवर्स बसवणार आहे.
यासाठी सरकारने 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वदेशी 4G दूरसंचार नेटवर्क लवकरच संपूर्ण भारतात आणले जाईल, BSNL ची देशभरात सुमारे 1.12 लाख टॉवर्स उभारण्याची योजना आहे, असेही ते म्हणाले होते. भारताचे स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्क कमीत कमी वेळेत तयार आहे. यासोबतच 2022 च्या अखेरीस 5G नेटवर्क तयार होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
वैष्णव पुढे म्हणाले, “मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की 4G दूरसंचार नेटवर्क लवकरच लॉन्च होणार आहे आणि ते भारतात भारतीय अभियंते आणि शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. आमच्या 4G नेटवर्कच्या विकासाचे जगभरात कौतुक होत आहे आणि त्यात संपूर्ण दूरसंचार उपकरणे असलेले कोर नेटवर्क, रेडिओ नेटवर्क यांचा समावेश आहे.
दरम्यान, दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विभागात अनेक गोष्टींवर चर्चा सुरू असून अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने या फ्रिक्वेन्सी बँडसाठी आधारभूत किमतीची शिफारस केली आहे. मोबाईल तसेच सॅटेलाइट सेवेसाठीही याचा वापर करता येईल, असेही सुचवले होते.