नवी दिल्ली – देशाच्या संरक्षणात लष्करी जवानांप्रमाणे निमलष्करी जवानांचेसुद्धा मोठे योगदान असते. देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी याच जवानांच्या खांद्यावर असते. परंतु विविध कारणांमुळे निमलष्कर दलातील जवानांचे स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कल्याणकारी योजना राबविण्यासह समुपदेशन करूनही स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. घरगुती कारणे, आरोग्यासंदर्भातील समस्या, मुले अथवा कुटुंबीयांच्या गरजांबाबतची कारणे सांगून स्वेच्छानिवृत्ती घेणार्या जवानांची संख्या खूपच जास्त आहे.
निमलष्करी दलाच्या आकडेवारीनुसार, सीमा सुरक्षा दलाचे सर्वाधिक जवान स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. दीर्घकाळ दुर्गम भागात तैनात असणे हेसुद्धा एक कारण आहे. २०१८ पासून मार्च २०२१ पर्यंत ११,६०० हून अधिक जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दरवर्षी ३,५०० जवान व्हीआरएस घेतात.
केंद्रीय राखीव सुरक्षा दलमधील (सीआरपीएफ) एक ते दीड हजार जवान व्हीआरएस घेतात. २०२० मध्ये हा आकडा कमी झाला होता. या काळात फक्त ६५४ जवानांनी व्हीआरएस घेतली होती. भारत-तिबेट सीमा पोलिस दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी) संख्येच्या तुलनेत छोटे दल आहेत. या दलातून व्हीआरएस घेणार्यांची संख्या सरासरी २०० ते २५० असते. आयटीबीपीमध्ये २०२० मध्ये हा आकडा ३०० च्या वर गेला होता.
व्हीआरएसपूर्वी समुपदेशन
सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी सांगतात, व्हीआरएस घेण्याची इच्छा व्यक्त करणार्या जवानांचे समुपदेशन करून भविष्यकाळातील आर्थिक संकटाबाबतही माहिती दिली जात आहे. त्यांना अनेक प्रकारचे सल्ले दिले जातात. त्यानंतरही जवान व्हीआरएस घेण्यासाठी ठाम राहिला तर व्हीआरएस मंजुरीची प्रक्रिया सुरू केली जाते.
सुट्टी आणि निवासाच्या तक्रारी
जवानांना निवास, पती-पत्नीला एका ठिकाणी नियुक्ती देण्यासह सुट्टीसारख्या अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तरीसुद्धा सुट्टी आणि निवास व्यवस्थेबाबत अनेक जवानांच्या तक्रारी कायम आहेत. सध्या निमलष्करी दल आपल्यास्तरावर जवानांच्या कल्याणाबाबतच्या योजनांशी संबंधित प्रस्ताव पुढे नेत आहे. सुविधांचा विस्तार केला जात आहे. निवासाची व्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली दिली जात आहे. परंतु संतुष्ट होण्याचा दर ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.