नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटल्याने त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. नाशिकमध्येही आज सकाळी असाच एक प्रकार घडला आहे. कॅनडा कॉर्नर येथील कर्नाटक बँकेच्या नावाला काळे फासणे आणि बँकेची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत वेळीच आंदोलकांना रोखले त्यामुळे फारसा गंभीर प्रकार घडला नाही.
कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड काल करण्यात आली. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांसह सौम्य लाठीमारही केला. मात्र, या घटनेमुळे मराठी अस्मिता जागृत झाली आहे. त्याचे विविध पडसाद उमटत आहेत. पुणे, बुलडाणा, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात कर्नाटकचा निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच, कर्नाटकच्या वाहनांवर जय महाराष्ट्र लिहिले जात आहे. पुण्यात कर्नाटकच्या काही वाहनांच्या काहाची फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता हे लोण नाशिकमध्ये पसरले आहे. आज सकाळीच कॅनडा कॉर्नर या भागातील कर्नाटक बँकेला आंदोलकांनी लक्ष्य केले. बँकेच्या ठिकाणी लिहिलेल्या कर्नाटक नावाला काळे फासण्यात आले. तसेच, बँकेच्या शटरवर जय महाराष्ट्र असे लिहिण्यात आले. तसेच, बँकेची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, ही बाब पोलिसांना समजताच मोठ्या संख्येने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंदोलकांना रोखण्यात आले.
Border Issue Impact Karnataka Bank Board Nashik