इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. जवळपास ४१० कोटी बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठे बजेट आणि तगडे कलाकार हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. यासोबत भरपूर व्हीएफएक्स इफेक्ट्सचा वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यावर ५० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
या बिग बजेट चित्रपटात कलाकारांचे मानधन हे देखील जास्तच आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूरसह दिग्दर्शक आणि सर्व टीमने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाकडून सर्वाना बऱ्याच आशा आहेत. ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. यात तो शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, साहजिकच तितकीच तगडी फी सुद्धा वसूल केली. एका रिपोर्टनुसार, रणबीरने या चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रूपये मानधन घेतलं. तर आलियाने १० ते १२ कोटी रूपये घेतल्याचं कळतंय.
आलिया पहिल्यांदाच रणबीरसोबत काम करत आहे. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. महानायक अमिताभ बच्चन हे या चित्रपटात गुरूच्या भूमिकेत आहेत. अमिताभ यांनी ८ ते १० कोटींमध्ये हा सिनेमा साईन केल्याचं कळतंय. साऊथ स्टार नागार्जुन याचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याने चित्रपटातील भूमिकेसाठी ९ ते ११ कोटी रुपये घेतले आहेत.
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय यात दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मौनीने चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेतले. चित्रपटात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनीही चित्रपटात भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांनी ८५ लाख मानधन घेतल्याचं सांगण्यात येतंय. अभिनेता प्रतिक बब्बर या चित्रपटात राजा सिंहची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने १ कोटी रुपये घेतले आहेत.
Bollywood Brahmastra Movie Stars Fees VFX Expenses
Ranbir Kapoor Alia Bhatt Star Cast