मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शिंदे सरकारने सेलिब्रेटींच्या सुरक्षेबाबतत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभिनेता सलमान खान आणि गायिका अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमृता या पत्नी आहेत.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने अभिनेता सलमान खानला मुंबई पोलीस Y+ श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. बिश्नोई टोळीने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात आहे. या वर्षी मे महिन्यात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या केल्याचा आरोप बिश्नोई टोळीवर आहे.
एखाद्या व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान करण्याबाबत राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल महत्त्वाचा असतो. संबंधित व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याचा विचार करुन राज्य सरकार सुरक्षेचा निर्णय घेते. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक मिळतील. २४ तास ते या दोघांना सुरक्षा देतील.
लॉरेन्स बिश्नोई याने काही वर्षांपूर्वी जोधपूर येथील न्यायालयात सुनावणीदरम्यान सलमान खानला धमकी दिली होती. सलमान खानने काळवीटाची शिकार करून बिश्नोईंच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटले होते. बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो आणि सलमान खानने त्याला मारून बिश्नोईंना भडकवले असे त्याचे म्हणणे आहे.
अलीकडेच सलमान खानच्या कुटुंबाला कागदी स्लिपच्या रूपाने धमकी मिळाली होती. सलमान खानचे वडील, लेखक सलीम खान त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकनंतर बसले होते त्याच बाकावर कोणीतरी धमकीची स्लिप टाकली होती. या धमकीनंतर सलमानला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. परंतु, आता राज्य सरकारने सलमानसा Y+ सुरक्षा कवच प्रदान केले आहे.
तसेच, सलमान खान व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अक्षयला एक्स प्रोटेक्शन देण्यात आले असून यामागचे कारण त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वाबाबत सोशल मीडियाचा द्वेष आणि धमक्या हे सांगितले जात आहे. विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाल्यापासून अनुपम खेर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांचीही सुरक्षा वाढविली आहे.
Bollywood Actor Salman Khan Security Enhance