मुकुंब बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपटांचे प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा आजही त्यांच्या निगेटिव्ह तथा नकारात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३२० चित्रपटात काम केले आहे. तसेच प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत नाव आणि प्रसिद्धी दोन्ही कमावले आहे. अर्थात, चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करत असले, तरी या क्षेत्रात नायक बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. तर त्यांच्या पालकांना त्याने डॉक्टर किंवा आयएएस अधिकारी बनावे असे वाटायचे. याबाबत द कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी सांगितले की, ते नायकाऐवजी खलनायक कसे बनले.
प्रेम चोप्रा यांचे बालपण हिमाचल प्रदेशातील शिमला येथे गेले. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शिमल्यातच घेतले. त्यानंतर त्यांनी पदवीसाठी पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यासासोबतच ते अभिनयाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी हिरो बनण्याचे ठरवले. शिक्षण पूर्ण होताच ते मुंबईत आले आणि चित्रपटसृष्टीत येण्यासाठी बराच काळ संघर्ष केला. प्रेम चोप्राने सांगितले की, त्यांनी पंजाबी चित्रपटांतून नायक म्हणून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव चौधरी कर्नाल सिंग होते, त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर त्यांनी काही आणखी चित्रपटांमध्ये नायकाचे काम केले, पण ते हिट होऊ शकले नाही. म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट जबरदस्त झाला, दुसरा जबरदस्तीने केला गेला. प्रेम यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी पंजाबी इंडस्ट्रीत फारसा एक्सपोजर नव्हता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली आणि रसिकांना त्यांची भूमिका खूप आवडली.
असे म्हटले जाते की, प्रेम जेव्हा नायक म्हणून काम करू शकत नव्हते. तेव्हा मेहबूबने त्याला खलनायकाची भूमिका करण्यास सांगितले. या सूचनेनुसार नंतर त्यांनी खलनायक म्हणून नशीब आजमावले आणि हळूहळू ते बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक बनले.