इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यासोबत त्यांच्या खासगी आयुष्यातही चाहत्यांना फारच इंटरेस्ट असतो. यातूनच बॉलीवूडमधील कलाकारांच्या घराच्या बाहेर त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहायला अनेकदा उभे असतात. किंवा त्यांच्या घराच्या पाटीसोबत सेल्फी काढताना दिसतात. त्यामुळेच कलाकार राहतात कुठे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असतेच. अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कार्तिक आर्यनने मुंबईतील अभिनेता शाहिद कपूरचे घर भाडेतत्वावर घेतले आहे. यासाठी तो महिन्याकाठी लाखो रुपये रक्कम मोजणार आहे.
अभिनेता शाहिद कपूर काही महिन्यांपूर्वीच त्याच्या नव्या घरी राहायला गेला. त्यामुळे मुंबईतील जुहू येथील त्याचं जुनं घर त्याने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. शाहिदने जुहू तारा रोड इथल्या प्रणेता बिल्डिंगमधील त्याचं घर अभिनेता कार्तिक आर्यनला भाडेतत्त्वावर दिलं आहे. या घरात शाहिद त्याची पत्नी मीरा, राजपूत आणि मुलं झैन, मिशा यांच्यासोबत राहायचा. जुहूमधील शाहिदच्या या घरातून सुंदर समुद्र दिसतो. शाहिदने त्याच्या लग्नापूर्वी २०१४ मध्ये जुहूमधील हे घर विकत घेतलं होतं.
या इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे जुहू बीचपासून हे खूपच जवळ आहे. प्रणेता इमारतीमधील हे फ्लॅट ३ हजार ६२५ स्क्वेअर फूटवर पसरलेलं आहे. शाहिदने जुलै २०१८ मध्ये प्रभादेवी याठिकाणी नवीन ड्युप्लेक्स फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट ८ हजार ६२५ स्क्वेअर फूट एवढा आहे. त्यावेळी शाहिदने तब्बल ५५.६० कोटी रुपयांना हा फ्लॅट विकत घेतला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो त्याच्या पत्नी आणि मुलांसह या नवीन घरात राहण्यासाठी आला.
समुद्रकिनारी असलेल्या या फ्लॅटसाठी कार्तिक आर्यन सध्या दर महिन्याला साडेसात लाख रुपये भाडं देणार आहे. दुसऱ्या वर्षात हे भाडं सात टक्क्यांनी वाढून ८ लाख रुपये इतकं होणार आहे. तर तिसऱ्या वर्षात कार्तिकला ८.५८ लाख रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. या घरासाठी त्याने ४५ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरले आहेत. शाहिदच्या घरात राहायला जाण्यापूर्वी कार्तिक वर्सोवा येथील अपार्टमेंटमध्ये राहायचा.
Bollywood Actor Kartik Aryan Mumbai Rented Home