पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर मेरीट येणाऱ्यांची तर चर्चा होतेच, पण त्यासोबत बिकट परिस्थितीवर मात करून उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्यांचेही कौतुक होत असते. सध्या पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील एका तरुणाने मिळविलेल्या डोळस यशाची सर्वत्र चर्चा होत आहे.
विवेक घुगे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात असून मुळचा नांदेड जिल्ह्यातील घोगेवाडी येथला आहे. काल बारावीच्या परीक्षेत त्याला ८४.३३ टक्के गुण मिळाल्याची बातमी पुढे आली आणि त्याच्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. त्याला कारणच असे आहे. विवेक अंध आहे. हे अंधत्व त्याला जन्मापासून नाही. वयाच्या सहाव्या वर्षी प्रकृती खराब असताना डोळ्यावर परिणाम झाला आणि त्याची दृष्टी गेली. तरीही चौथीपर्यंत सामान्य शाळेत शिकला. कारण अचानक आलेल्या अंधत्वाने तो आणि त्याचे कुटुंब सावरले नव्हते.
पालकांना आपल्या मुलाला अंध म्हणून वागणूक मिळावी, असे मुळीच वाटत नव्हते. त्याच्यावर मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये उपचाराचे प्रयत्न झाले. पण दृष्टी परत येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अंध विद्यालयात टाकण्यात आले. दहावीमध्ये त्याला ८० टक्के गुण मिळाले. त्यानंतर चांगले शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांनी पुण्यातल्या स.प. महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेऊन दिला. पण हे एवढे सोपे नव्हते. कारण पुण्यातल्या रहदारीत एका हाताने काठी टेकवत रस्त्याचा अंदाज घेत पुढे जाणे हे एव्हरेस्ट सर करण्यासारखेच आहे. विवेकमध्ये प्रचंड जिद्द आहे. त्यामुळे त्याने त्या संकटावरही मात केली आणि बारावीत ८४.३३ टक्के गुण संपादन केले.
गंगा आली मदतीला
विवेकसोबत त्याची बालमैत्रीण गंगा देखील पुण्यात आले. ती सुद्धा अंध आहे. दोघेही लहानपणापासून सोबतच शिकले. पुण्यात आल्यावर मागे वळून बघू नकोस, असे तिने विवेकला म्हटले आणि दोघांनी एकत्र बारावीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला.
रस्त्यावर हात देणाऱ्यांचे आभार
विवेक याने आपल्या यशासाठी आई-वडील, गंगा आणि स.प. महाविद्यालयातील शिक्षक राहुल मेश्राम यांचे आभार मानले आहेच. शिवाय अतिशय संवेदनशील मनाच्या विवेकने प्रत्येक टप्प्यावर ज्या अनोळखी लोकांनी हात देऊन रस्ता पार करून दिला, त्यांचेही आभार मानले आहेत.