बीड – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर आयोजित मेळाव्यात त्यांनी नेहमीप्रमाणे उत्साही भाषण केले. तुम्ही आहात म्हणून मी आहे, वडिलांचे आशिर्वाद आणि आपला डोक्यावर हात असल्यामुळे मी निश्चिंत आहे. ऊसतोड कामगार व मुकादम मंडळींनी कष्टाचे प्रतीक म्हणून ऊसाची मोळी देऊन माझं स्वागत केलं. उसाच्या मोळीच्या ओझ्यापेक्षा ऊसतोड कामगारांचा विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यासाठी अविरतपणे काम करत राहील. वेळ आली तर तुम्हा सर्वांवर जीव ओवाळून टाकेल, अशी ग्वाही पंकजा यांनी यावेळी दिली.
पंकजा यांच्या भगिनी आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या. प्रशासनाने विविध नियम आणि अटीद्वारे मेळाव्यास परवानगी दिली. त्यांचे आभारी आहे. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. देशात असा सोहळा कुठे होत नाही. माझे भाग्य की मी इथे आहे. हेलिकॉप्टरमधून मी भगवान बाबा यांच्या बरोबरच आपल्या सर्वांच्या पायावर फुले टाक होते. कुठलाही अन्य हेतू नव्हते. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा अशीच कायम रहावी. घरची पुरणपोळी एवढी गोड लागत नाही जेवढे येथे आल्यावर गोड वाटते, असे पंकजा म्हणाल्या. याप्रसंगी डॉ. प्रीतम यांनीही भाषण करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.