मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्याप भाजपने महाविजय २०२४चा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्नाला लागावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने सर्व आमदारांपुढे त्यांचे प्रगतीपुस्तक ठेवत कामगिरी सुधारण्याचा आदेश दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी २०२४चे मिशन गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वात अद्याप भाजपला शंभर टक्के यश मिळालेले नाही. कसबासह काही पोटनिवडणुकांमध्ये अपयश चाखावे लागले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही बावनकुळेंचा करिष्मा सर्वत्र चाललेला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरात दौरे करत बैठकांचे सत्र चालविले आहे. या अंतर्गत बावनकुळे यांनी प्रत्येक विभागातील आमदारांच्या स्वतंत्र बैठका प्रदेश भाजप कार्यालयात घेतल्या आणि त्यामध्ये आमदारांच्या हाती त्यांचे रिपोर्ट कार्ड दिले. असे सर्वेक्षण करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून दिले होते, अशी माहिती आहे.
आमदारांची एकूण कामगिरी, त्यांनी कोणती विकासकामे केली, कोणती केली नाहीत, मतदारांशी त्यांचा संपर्क किती आहे, ते जनतेच्या समस्या किती गतीने सोडवतात, मतदारसंघातील भाजप पक्षसंघटनेशी त्यांचे संबंध चांगले आहेत की वाईट, याचा लेखाजोखा या सर्वेक्षणात आहे. प्रत्येक आमदाराबाबत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल हा शंभर पानी आहे. मात्र, या सर्वेक्षणाच्या आधारे जे रिपोर्ट कार्ड आमदारांच्या हाती देण्यात आले, ते पाच ते सहा पानांचे आहे. कारण, त्यात आमदारांबाबत दिसलेल्या उणिवांचाच उल्लेख आहे.
गुप्त पद्धतीने सर्वेक्षण
भाजपद्वारे झालेल्या सर्वेक्षणाची कल्पना आमदारांनादेखील नव्हती. अत्यंत गुप्त पद्धतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मतदारसंघात भाजपमध्ये किती व कशी गटबाजी आहे, या गटबाजीचा पक्षाला कसा फटका बसतो, आमदारांचे विविध गटांशी कसे संबंध आहेत, आमदारांचा मतदारसंघातील वैयक्तिक प्रभाव किती आहे आणि पक्ष म्हणून भाजपचा प्रभाव किती आहे, कोणत्या समाजात आमदारांबद्दल काय मत आहे, सरकारी योजनांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे झाली आहे, याचा सगळा तपशीलही आहे.
BJP MLA Report Card Survey Upcoming Elections