नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादीतून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. केंद्रीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही निवड करण्यात आली आहे. नितीन गडकरींना मात्र या यादीतून वगळण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे नितीन गडकरी हे भाजपचे लालकृष्ण अडवाणी होणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राजकारण, सत्ताकारणाचा खेळ कधी आणि कसा बदलेल हे सांगता येत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले नितीन गडकरी हे मोठे नाव आहे. विदर्भातलं हे नेतृत्व सध्या केंद्रीय स्तरावर आहे. आणि त्यांच्या खात्याने केलेल्या रस्तेनिर्मितीच्या कामांमुळे देशभरात त्यांची वाहवाच होत असते. मात्र तरीही गडकरी यांना केंद्रीय निवडणूक समितीसोबतच भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजप गडकरींना हळूहळू केंद्रीय स्तरावरील समित्यांमधून आणि परिणामी राजकारणातून दूर ढकलत चाललंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनीही सध्याचं राजकारण पाहता अनेकदा राजकारण सोडावं वाटतंय अशी भावना व्यक्त केली होती. त्यावेळी गडकरी म्हणाले होते की, राजकारण शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे? जुन्या काळामध्ये महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेनं कार्य झालं ते पॉलिटिक्स होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण होतं. आता आपण जे बघतो ते केवळ १०० टक्के सत्ताकारण बघतो. त्यामुळे सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. आणि म्हणून या राजकारणात राहत असताना शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला, पर्यावरण या क्षेत्रासाठी काम केलं पाहिजे, असे गडकरी म्हणाले होते.
गडकरींनी स्पष्ट केले की, मलाच हळूहळू वाटायला लागलंय की, मीच राजकारण कधी सोडावं अन् कधी नाही, राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या असतात, असं गडकरी म्हणाले होते. गडकरींच्या राजकारण सोडण्याविषयीच्या या वक्तव्याला महिना होत नाही तोच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय समितीतून त्यांचं नाव वगळण्यात आल्याचे समोर येतंय. दुसरीकडे राजकारण सोडण्याविषयी गडकरींनी केलेल्या वक्त्यव्यामुळेच भाजपने त्यांना केंद्रीय निवडणूक समितीतून बाजूला केल्याची चर्चाही रंगली आहे.