मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विरोधी पक्षातील दिग्गजांचे घोटाळे बाहेर काढून राजकीय वातावरण कायम गरम ठेवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
सोमय्या यांच्या मुलुंड (पूर्व) कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी नवघर पोलिस स्टेशन येथे तक्रार केली असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २०१७-१८ पासून संस्थेमार्फत ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन (श्रवणयंत्र) ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करून मशीनचे वाटप होते.
कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (३७) आणि श्रीकांत रमेश गावित (३६) यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाते. काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्लक आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.
BJP Leader Kirit Sommaiyya Office Scam Crime