मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलांचे प्रश्न किंवा अस्मितेचा प्रश्न आला की, भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यात लढा दिला नाही तरच नवल. मात्र अलीकडेच त्यांनी उर्फी जावेदच्या वेबसिरीजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी त्यांना धारेवर धरले. आणि आता चक्क महिला आयोगानेच त्यांना नोटीस पाठवून अडचणीत आणले आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या पोस्टवर आक्षेप घेताना ती मला प्रत्यक्ष भेटली तर थोबाडीत लावेन, अशी भूमिका जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी अमृता देवेंद्र फडणवीस, केतकी चितळे आणि कंगना रणौत यांची बोल्ड छायाचित्रे पोस्ट करत यांच्याबद्दलही असेच विधान करणार का, यांनाही अश्याच धमक्या देणार का, असे सवाल उपस्थित केले होते. त्यावर पुढे सोशल मिडियावर चांगलेच वाद रंगले.
उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर कारवाईचा अधिकार राज्य महिला आयोगाचा आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. त्याला उत्तर म्हणून आता आयोगानेच त्यांना नोटीस पाठविल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
काय म्हणाले आयोग?
चित्रा वाघ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून आयोगाचा अपमानही केला आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडून अवमानना नोटीस बजावण्यात आली आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
तर एकतर्फी निर्णय घेणार
चित्रा वाघ यांनी खुलासा सादर केला नाही, तर त्यांना या प्रकरणात काहीही म्हणायचे नाही, असे गृहीत धरण्यात येईल व आयोग त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी तेजस्वीनी पंडीत यांना आयोगाने कुठलीही नोटीस पाठविलेली नाही, तर दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवली होती, असेही वाघ यांनी म्हटले आहे.
नोटीस मिळाल्यावर वाघ म्हणाल्या…
चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे.. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही… अशी भूमिका घेणारीला पाठवली… असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!
https://twitter.com/ChitraKWagh/status/1611342039563767809?s=20
BJP Leader Chitra Wagh Urfi Javed Women Commission Notice
Rupali Chakankar









