लखनऊ (उत्तर प्रदेश) – पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली असून भाजपने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सारखे मोठे राज्य आपल्या हातात कायम रहावे, म्हणून भारतीय जनता पक्षाने वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे, यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपा मधील दिग्गज नेते तयारीला लागले आहेत.
सन २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षात मोदी युग सुरू झाले. त्यांच्या गुजरात मॉडेलचे व्हिजन डॉक्युमेंट लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने सादर केले होते, गुजरात मॉडेलमुळे भाजपची केंद्रात सत्ता आली असे म्हटले जाते, किंबहुना त्यानेच पक्षाला इथपर्यंत पोहोचण्यात विशेष भूमिका बजावली. यूपीमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी पक्षाने आता ‘काशी मॉडेल’ तयार केले आहे. हे मॉडेल देशात आणि राज्यात घरोघरी नेण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे.
‘चलो काशी’ची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१३ डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ धाम भाविकांना समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘चलो काशी’ची घोषणा देत भाजप आता देशाला आणि जगाला ‘दिव्य काशी – भव्य काशी ‘ असे वैभव दाखविण्याच्या तयारीत आहे. संघ आणि भाजपच्या राजकीय रोडमॅपवर अयोध्येसोबतच काशी आणि मथुरेचे टप्पेही चिन्हांकित आहेत. अयोध्येतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप मंदिर उभारणीच्या अजेंड्यावर पुढे सरसावला आहे.
अघोषित कुंभमेळा
काशीच्या कायापालटाचा पाया नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेऊन त्यांनी भाजपला सत्ता स्थानावर बसविले तेव्हाच घातला गेला होता. उत्तर प्रदेशातील लखनऊला त्यांनी आपले कार्यस्थान बनवले आणि घोषणा केली होती की, ‘गंगा मातेने मला बोलावले आहे ‘. काशीमध्ये रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांच्या विकासाबरोबरच बरीच कामे झाली पण मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा आहे. दि. १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान त्याचे लोकार्पण करणार आहेत. यासोबतच काशीमध्येही अघोषित कुंभमेळा सुरू होणार असून येथे देशभरातून आणि जगभरातून भाविक जमतील. त्यामुळे अशा काशी मॉडेलच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण निर्माण करण्याची भाजपची योजना आहे.
असे आहे काशी मॉडेल
वाराणसीत प्रवेश करताच भाविकांना काशी विश्वनाथ मंदिराची भव्यता जाणवू लागेल. बाबतपूर विमानतळावरून शहराकडे जाणारा मार्ग असो की, स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. रात्रीच्या वेळीही बाबा विश्वनाथांची आकृती आकाशात रंगीबेरंगी दिव्यांनी उगवताना दिसेल. जगाच्या धार्मिक पर्यटन नकाशावर काशीला ठळकपणे स्थान देण्याची योजना आहे. मोदींच्या काशी मॉडेलला आकार देण्यासाठी योगी सरकारनेही खूप जोर लावला आहे.
घरोघरी पोहोचायचे
काशीमध्ये १३ डिसेंबरपासून ते पुढील वर्षी मकर संक्रांती म्हणजेच १४ जानेवारीपर्यंत कार्यक्रमांची संपूर्ण मालिका आयोजित केली जात आहे. यामध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही येथे आमंत्रित केले आहे. याशिवाय देशाचे महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, टूर ऑपरेटर, उद्योगपती, ब्लॉगर, लेखक, धार्मिक अभ्यासक, दलित-अनुसूचित विचारवंत, कलावंत, कारागीर, कथाकार, कारागीर, वास्तुविशारद आणि सर्व प्रतिनिधींच्या स्वतंत्र परिषदा आहेत. तसेच परदेशी राजदूतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. युवा महोत्सवासोबतच सुशासन यात्राही निघणार आहे. या सगळ्यातून काशीचे मॉडेल घरोघरी नेण्याची योजना आहे.
यापूर्वी गुजरात मॉडेल
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विजयाचा जणू दस्तावेज तथा विकास आराखडा तयार केला होता. या मॉडेलचा अर्थ असा की, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, कमी महागाई, अर्थव्यवस्थेची वेगवान वाढ, दर्जेदार शिक्षण, उत्तम सुरक्षा आणि चांगले जीवन असे म्हटले जात होते. २००१ ते २०१२ दरम्यान, त्याचा जीडीपी १० टक्क्यांच्या जवळ होता, तो राष्ट्रीय विकास दरापेक्षा जास्त होता. या सर्व गोष्टींच्या आधारे तयार केलेल्या मॉडेलने भाजपला राष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व यश मिळवून दिले होते.