विशेष प्रतिनिधी, मुंबई
१२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी भाजपने आज विधिमंडळ कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रारंभीच भाजप आमदारांनी विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवरच प्रतिअधिवेशन सुरु केले आहे. या प्रतिअधिवेशनाच्या अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली. पण, या प्रतिअधिवेशाचे पडसाद विधी मंडळाच्या अधिवेशनात उमटल्यामुळे तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर भाजप आमदारांकडून माईक व स्पीकर काढून घेण्यात आले. कारवाईसाठी सुरक्षा अधिकारी दाखल झाले. भाजपच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु केली. सरकारने आणीबाणी लावण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की,आमचे आंदोलन सुरुच राहणार, विधीमंडळात सत्तारुढ पक्षाकडून काळा अध्याय लिहला गेला, आम्ही शांतपणे निदर्शन करत असतांना मार्शल पाठवून, पत्रकारांवर दंडूकेशाही करण्याचा प्रयत्न केला गेला. आमचे अधिवेशन चालु राहणार आहे. महाराष्ट्र पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे, काल खोटे आरोप आमच्या १२ आमदारांना निलंबित केले गेले. आम्ही सरकारचे सर्व भ्रष्टाचार काढू असेही त्यांनी सांगितले.