इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी गुरुवारी मोठ्या घडामोडी घडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गुरुवारी या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे सकाळीत तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दुपारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
त्यानंतर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्र बैठक झाली.
या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे.