”बिपोरजॉय’ चक्रीवादळाने दिशा बदलली
आता पुढे काय होणार
अरबी समुद्रात घोगावणारे अतितीव्र स्वरूपातील च. वादळ आता येमेन वा ओमान ह्या आखाती देशांच्या कि. पट्टीवर न आदळता भारत व पाकिस्तान देशांच्या सीमावर्ती भागात कच्छतील ‘मांडवी’ तर ‘कराची’ शहरा दरम्यानच्या पश्चिम किनारपट्टी भू-भागावर ४ दिवसानंतर म्हणजे गुरुवार दि.१५ जून दुपार नंतर ताशी १२५ ते १५० किमी. अश्या त्याच्या परिघ-चक्रकार वारा वेगानेआदळण्याची शक्यता जाणवते.
त्यामुळे रेंगाळलेल्या नैरूक्त मान्सूनचे आगमनही नेटाने होवून महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात भाकीत तारखेच्या तसेच गुजराथ राज्यात त्याच्या नियोजित सरासरी तारखेला म्हणजे १५ ते १७ जुन दरम्यानही होवु शकते असे वाटते.
वादळाच्या परिणामामुळे सौराष्ट्र व कच्छ विभागात मंगळवार दि.१३ ते शनिवार दि.१७ जून पर्यंतच्या ५ दिवसात जोरदार पावसाची शक्यता जाणवते तर महाराष्ट्रातील मुंबईसह कोकणातील उत्तर पश्चिम किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रातील खान्देश व नाशिक जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासहित मध्यम पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
बिपोरजॉय ने दिशा का बदलली?
वादळाच्या दोन्हीही म्हणजे पश्चिम बाजूला अरबी समुद्रात तर पूर्वबाजूला महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी भू-भागावर जमिनीपासून ६ ते १० किमी. उंचीवर असलेले साधारण ४ किमी. जाडीचे उच्चं हवेच्या दाबाचे प्रत्यावर्ती चक्रवती क्षेत्रे व सॅन्डविच सारखे दोघांच्या मधून त्याच उंचीपर्यंत असलेल्या बिपोरजॉय वादळाचे क्षेत्र ह्यामुळे सरळ पश्चिम कि. पट्टी समांतर बिपोरजॉय उत्तरेकडे मार्गक्रमण करणार आहे परंतु साधारण १४ जून दरम्यान अरबी समुद्रातील हवेचा उच्चं दाबाच्या अति प्रभावामुळे त्याची दिशा पूर्वेकडे होवून वादळ ईशान्येकडे गुजरातकडे वळणार आहे.
उत्तर भारतात १० ते १२ किमी उंचीवर असलेला पश्चिमकडून पूर्वेकडे वाहणारा अति-वेगवान वाऱ्याचा आडवा झोत-पट्टा अधिक दक्षिणेकडे म्हणजे राजस्थान मध्यप्रदेश राज्य रेषे पर्यन्त सरकल्यामुळे चक्रीवादळाच्या उत्तरदिशा मार्गक्रमणास अटकाव होण्याच्या शक्यतेमुळे वादळाची दिशा येमेन वा ओमान ह्या आखाती देशांच्या कि. पट्टीवर न होता भारत व पाकिस्तान देशांच्या सीमावर्ती भागाकडे वळली.
सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बिपरजॉय हे चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी रात्री पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५१० किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ तौक्ते चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १७५ किलोमीटरहून अधिक आहे. बिपरजॉय चक्रीवादळ १५जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता, वर्तवली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या अंदाजे मार्गात बदल झाला आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या १२ तासांमध्ये चक्रीवादळ पुढे सरकत आहे. चक्रीवादळाच्या आसपासच्या समुद्री भागात १५० किमी ताशी वेगाने वारे वाहत आहेत.
सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ
बिपरजॉय चक्रीवादळ तौक्तेनंतरच सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा चक्रीवादळ धडकणार तेव्हा वाऱ्यांचा ताशी वेग १३० किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकण्याची शक्यता नाही. बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये धडकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच १५ जूनपर्यंत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील चार राज्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातला सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Biperjoy Cyclone Direction Change Alert