बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात बायोगॅसची टाकी साफ करताना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. बारामती तालुक्यातील खांडज येथील ही घटना आहे.
बायोगॅसची टाकी साफ करताना त्यात पडल्याने आणि गुदमरल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये आटोळे कुटुंबातील तिघांचा तर गव्हाणे कुटुंबातील एकाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (६०), प्रवीण भानुदास आटोळे (३२), प्रकाश सोपान आटोळे (५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे (३८) यांचा समावेश आहे. या चौघांमध्ये भानूदास व प्रवीण हे पितापूत्र आहेत. ही बायोगॅसची टाकी गोठ्यात होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. गोठ्यातील शेण आणि गोमूत्राची टाकी साफ करण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली.
घटनेनंतर लगेच चौघांनाही बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चौघांनाही रुग्णालयात हलविल्यानंतर गावकऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. डॉ. अजित कोकरे, डॉ. निर्मलकुमार वाघमारे, आणि डॉ. महेश जगताप यांनी चौघांच्या उपचारासाठी धाव घेतली. त्यांनी प्राथमिक उपचारही केला. परंतु, त्याचा काहीही उपयोग नव्हता. कारण उपचाराला प्रतिसाद देण्यापूर्वीच चौघांचीही प्राणज्योत मालवली होती. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
Biogas Tank Cleaning 4 Death in Baramati