विशेष प्रतिनिधी, इस्लामाबाद
चोरांचे अनेक प्रकार असतात, भुरट्याचोर पासून ते दरोडेखोरांपर्यंत अनेक प्रकारचे चोरटे दुसऱ्याच्या धनसंपत्ती, पैसा, सोने-नाणे यावर डल्ला मारून त्यांना लुटतात. आता तर सायबर क्राईम या प्रकाराने धुमाकूळ घातला असून बँकांमधील लाख रुपयांची रक्कम काही क्षणातच हे चोरटे लंपास करतात. याचा फटका अनेकांना बसतो. चोरटे कोणालाही सोडत नाहीत, अगदी सर्वसामान्य माणूस असो की एखादा श्रीमंत व्यक्ती असो. एका चोरट्याने तर चक्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीवर डल्ला मारला आहे.
एका चोरट्याने जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेल्या बिल गेट्सची ‘फसवणुकी’ केली आहे. एका पाकिस्तानी व्यक्तीने सात अब्ज रुपयांहून अधिक ही ‘फसवणूक’ केली. ‘द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल एलिट वॉज ड्रोपड, बाय कॅपिटलिस्ट फेयरी टेल’ एका पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, आरिफ नकवी नावाच्या पाकिस्तानीने बिल गेट्सला सुमारे ७.४१ अब्ज रुपयांना फसवले होते. सायमन क्लार्क आणि विल लॉफ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात म्हटले आहे की, नकवी हा एक ‘ठग’ होता, तो केवळ अब्जाधीशांची संपत्ती हडप करायचा.
आरिफ पाकिस्तानमधील एका खासगी इक्विटी फर्मचा प्रमुख होता. जागतिक गुंतवणूकदारांचे पैसे मिळवताना त्याने बिल गेट्ससह अनेक श्रीमंतांशी चांगले संबंध निर्माण केले. आणि याचाच फायदा घेऊन त्याने बिल गेट्सकडून मोठी रक्कम चोरली. आरिफ नकवीने सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सचा गैरव्यवहार केला होता. विशेष म्हणजे या संपूर्ण रकमेच्या अर्ध्या रकमेचा कोणताही हिशेब सापडला नाही. परंतु नकवी या प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊ शकतो. कारण त्याच्या एका सहकारी कर्मचाऱ्याने सर्व गुंतवणूकदारांना ई-मेल पाठवून या चोरीची माहिती दिली होती.