मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत. रस्त्यांचे, उड्डाणपुलांचे, सी-लिंकचे अशी अनेक कामे सुरू आहेत. विविध कंपन्यांच्या या कामांचे टेंडर देण्यात आले आहे. मात्र एका कामासाठी निवडण्यात आलेल्या कंपनीला मुंबईतून हाकलून देण्याची मागणी होऊ लागली आहे.
मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे, त्या कंपनीने २० टक्के काम केले आहे. परंतु, तरीही कंपनीकडून काम काढून घ्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी केली आहे. या लिंक रोडच्या बांधकामाचे काम पी.एस. सिंगला कंपनीला देण्यात आले आहे.
रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असून त्यांनी मनपा आयुक्तांकडे कंपनीला हाकलून देण्यासंदर्भात मागणी केली आहे. यासाठी एक पत्रही त्यांनी लिहीले आहे. विशेष म्हणजे अचानक या कंपनीला हाकलून देण्याची मागणी का झाली, असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु, त्याचे कारणही अत्यंत गंभीर असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.
सोमवारी बिहारमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला भागलपूरचा पूल कोसळला. हा पूल पी.एस. सिंगला कंपनीच बांधत होती. सुदैवाने बिहारमधील घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण मुंबईत अश्याप्रकारची घटना घडली तर किती लोकांचे प्राण जातील, याचा विचार महानगरपालिकेने करावा, असे राजा यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये कंपनी ब्लॅक लिस्ट
पूर्व व पश्चिम मुंबईला जोडणारा गोरेगाव-मुलूंड लिंक रोडचा उड्डाणपूल हा मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. डिसेंबर २०२१ मध्ये संबंधित कंपनीला कार्यादेश देण्यात आले आणि त्यानंतर काम सुरू झाले. परंतु, ही कंपनी आता बिहारमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सुद्धा ही कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात यावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
Bihar Bridge Collapse Company Maharashtra Project