भारत – एक दर्शन
भाग २९
चिरंतन हिंदुधर्म
(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना “प्राप्त” झालेला संदेश…)
भारताचा उदय व्हावा असे म्हटले जाईल तेव्हा त्याचा अर्थ ‘सनातन धर्मा’चा उदय होईल. भारत महान होईल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा तेव्हा हा ‘सनातन धर्म’च महान होईल. भारताचा विस्तार होऊन, त्याची व्याप्ती वाढेल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा त्याचा अर्थ हाच की, या ‘सनातन धर्मा’चा विस्तार होऊन, स्वयमेव त्याची व्याप्ती जगभर वाढेल. धर्माकरताच आणि धर्मामुळेच भारताचे अस्तित्व आहे…
आपण ज्याला ‘सनातन’, शाश्वत – eternal – धर्म असे संबोधतो तो धर्म म्हणजे आहे तरी काय? तो हिंदुधर्मच आहे. तो धर्म हिंदु आहे याचे कारण हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन करण्यात आले आहे. समुद्र आणि हिमालय यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि या प्राचीन पुण्यभूमीत त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी आर्यांकडे देण्यात आली. पण कोणत्याही एका देशापुरताच तो सीमित असावा यासाठी तो मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगाच्या अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागाच्या मालकीचा नाही व सदा सर्वकाळासाठी तो त्यास बांधला गेलेला नाही…
ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर सनातन धर्मच आहे. याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. एखादा धर्म संकुचित असेल, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा असेल, तो मर्यादित स्वरूपाचा असेल तर, असा धर्म मर्यादित काळापर्यंतच टिकू शकेल; व ठरावीक हेतू अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहू शकेल.
— श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Hindu Religion Shreearvind