भंडारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील नदी-नाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला आहे. कारधा लहान पुलाच्या धोका पातळीपेक्षा पाणी अधिक म्हणजे 247.70 मीटर जलप्रवाह होता, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. भंडारा शहरातील समाजमंदिर, शाळा, सामाजिक सभागृह आदी पाच ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ग्रामीण भागात 37 ठिकाणी पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुजारीटोला धरणाची 6 दारे उघडली असून त्यामधून 128.31 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडा बॅरेजमधून 7644.51 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून गोसेखुर्दच्या 33 दाराव्दांरे 15072.25 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यत सरासरी 129 टक्के पाऊस झाला असून भंडारा शहरातील 10, पवनी तालुक्यातील 4, तुमसरमधील तामसवाडी ते डोंगरला, मोहाडी तालुक्यातील 6 व लाखांदूरमधील लाखांदूर ते सोनी ते वडसा रस्ता असे एकूण 22 रस्ते बंद असल्याची माहिती या कक्षाने दिली आहे.
मंगळवारी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने भंडारा शहरातील 354, कारधा 78, गणेशपूर 80, भोजापूर 69, सालेबर्डी 3, दाभा 12, कोथुर्णा 20, दवडीपार येथील 1, करचखेडा येथील 12, पिंडकेपार येथील 1, कोरंभी येथील 4, लावेश्वर 7, खमारी 12, टाकळी 10 कुटुंबाना निवारागृहात आसरा देण्यात आला आहे. तुमसर, मोहाडी, लाखांदूर एकूण 864 कुटुंबातील 3313 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निवारा देण्यात आला.
पूर परिस्थितीचे दोन बळी
संदीप बाळकृष्ण चौधरी, (वय 40 वर्ष रा. किसान चौक, शुक्रवारी, भंडारा) हे महावितरणचे कर्मचारी आज दुपारी बैल बाजार, मेंढा येथे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुमसर तालुक्यातील मौजा सिलेगाव येथील सिलेगाव – वाहनी नाल्यावरील पुलावरून श्यामा सांगोडे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अद्याप त्यांचा शोध लागला नसून सिहोरा पोलीस शोध घेत आहेत.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काल रात्री उशिरापर्यंत मदत केंद्राची पाहणी व पूरग्रस्त नागरिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्थेबाबत स्वत: भेट देवून पाहणी केली. पूराचे पाणी ओसरताच सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नैसर्गिक आपत्ती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या काळात प्रशासनाने व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाणीपातळी वाढत असून विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. पाण्यात बोटिंग करताना लाईफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Bhandara District Heavy Rainfall Flood Critical Situation