मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हल्ली इंटरनेट बँकिंग आणि युपीआयची सोय झाल्यामुळे बँका बंद असण्याचा खूप परिणाम होत नाही. मात्र मोठे व्यापारी, शेतकरी, मजूर वर्ग यांच्यासाठी बँका चार दिवस सलग बंद असणं त्रासदायक ठरतं. या महिन्याच्या अखेरीस हाच त्रास सहन करण्याची वेळ यांच्यावर येऊ शकते. कारण महिन्याअखेरचे चार दिवस कर्मचारी संघटनेच्या संपामुळे बँका बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फोरम अॉफ बँक युनियनने विविध धोरणांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. या संघटनेने आक्रमक भूमिका घेत ३० व ३१ जानेवारीला दोन दिवस संप पुकारला आहे. तसे झाल्यास २८ व २९ चौथा शनिवार व रविवार आणि पुढचे दोन दिवस संप, असे चार दिवस सलग बँका बंद राहू शकतात. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे महासचिव सी.एच. व्यंकटचेलम यांनी या संपाची माहिती दिली आहे. महिन्याअखेरचे दोन दिवस बँका पूर्णपणे बंद राहिल्यास ग्राहकसेवेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापूर्वीही एकदा बँकांनी संप पुकारला असताना ग्राहकसेवेवर मोठा परिणाम झाला होता. यंदा एटीएमसेवेवरही परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपाचा थेट परिणाम सरसकट सर्वच ग्राहकांच्या व्यवहारावर होऊ शकतो.
या आहेत मागण्या
बँकांचा सरसकट पाच दिवसांचा आठवडा करावा, एनपीएस समाप्त करावे, बँकांच्या सर्व विभागातील रेंगाळलेल्या भरती तातडीने कराव्या, वेतन सुधारणा करावी, पेन्शन अपडेट करण्यात यावी, यासारख्या विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यानेच बंद पुकारण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाच्या तोडांवर
केंद्राचा व राज्याचा अर्थसंकल्प फेब्रुवारी व मार्चमध्ये जाहीर होईल. अश्यावेळी संप पुकारण्यात आल्याने त्याचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे. कारण संघटनांनी मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदने दिली, पण प्रतिसाद न मिळाल्याने भारतीय बँक संघाने संपाचा निर्णय घेतला.
Bank Strike Threat Employee Union 4 Days
Banking Finance