इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खाद्यतेल व्यापारी दिनेश अरोरा याने बँक ऑफ बडोदाची तब्बल ३२ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बँकेकडून अधिकृत कागदपत्रे मिळवत त्याचा इतर बँकांकडून पैसा लाटण्यासाठी वापर करणे, बँकेकडून मिळालेल्या निधीचा वापर उधळपट्टीसाठी करणे अशा अनेक बाबी आता समोर आल्या असून अरोरा यांची सीबीआय चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीत दोन चार्टर्ड अकाउंटंट कंपन्यांचीही विचारपूस करण्यात आली शून, या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
दिनेश अरोरा यांनी कृष्णा कंटेनर्सच्या नावाने बँक ऑफ बडोदामध्ये कॅश क्रेडिट आणि एलसी म्हणजेच लेटर ऑफ क्रेडिट सुविधेचा लाभ घेतल्यानंतर निधी दुसरीचकडे वळवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयच्या तपासात ३९ कोटी ५७ लाख रुपयांची २६ लेटर ऑफ क्रेडिट जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, आकारण्यात आलेली बिले खोटी असून ती एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीत समायोजित करण्यात आली होती. त्यामुळे सीबीआयने कंपनीच्या सीए आणि स्टॉक ऑडिटरच्या नावाचाही तपासात समावेश केला आहे. सीए पंकज खन्ना अँड असोसिएट्स आणि स्टॉक ऑडिट करणारे ऑडिटर सीए मनीष श्रीवास्तव आणि त्यांची कंपनी सीए मनीष-अवनीश अँड कंपनी यांचीही यात चौकशी करण्यात येत आहे. ऑडिट कशा पद्धतीने करण्यात आले, व्यवहाराच्या तपासात एवढा निष्काळजीपणा कसा काय झाला, बनावट बिलिंगबाबत प्रश्न का उपस्थित केला गेला नाही, याबाबत सर्वांची भूमिका तपासली जाणार आहे.
आतापर्यंतच्या सीबीआय तपासात कृष्णा कंटेनर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. बँकेची फसवणूक करण्यासाठी, त्याने सहयोगी आणि इतर फर्मच्या मदतीने खोटी बिले तयार केली. चलनाचा वापर प्रत्यक्ष व्यवसासाठी करणे अपेक्षित असताना व्यवसाय न करता ते इतरांच्या खात्यात वळवण्यात आले. त्यातून बँकेच्या निधीची उधळपट्टी करण्याचा त्यांचा डाव यामुळेच समोर आला आहे. तसेच बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट पत्र इतर बँकांकडून सूट मिळवण्यासाठी वापरले गेले. याबद्दल बँक ऑफ बडोदाला कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्या क्रेडिट पत्राच्या आधारावर फसवणूक करून इतर बँकांमधूनही कोट्यवधी रुपये दिनेश अरोरा आणि सहकारी कंपन्यांनी घेतले. एवढी मोठी फसवणूक चार वर्षे चालली आणि तरी कंपनीच्या सीए फर्म आणि ऑडिटरच्याही लक्षात आले नाही असे कसे होऊ शकते. त्यामुळेच या दोन्ही फर्मचाही तपासात समावेश करण्यात आला आहे.