नवी दिल्ली – तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवता का? तुमचे उत्तर होय असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँक लॉकरच्या भाड्यासंदर्भात दिशानिर्देशांमध्ये संशोधन केले आहे. या दिशानिर्देशांमध्ये बँकांसाठी भरपाईचे धोरण आणि उत्तरदायित्वासंदर्भात सविस्तर उल्लेख केला आहे.
काय आहेत दिशानिर्देश
आरबीआयच्या नियमांनुसार, निष्काळजीपणाबाबत बँकांनी ग्राहकांच्या वस्तूंबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी मंडळाद्वारे मंजूर धोरण लागू करणे आवश्यक आहे. भूकंप, पूर, वीज कोसळणे, वादळे, पाऊस असे नैसर्गिक संकट (अॅक्ट ऑफ गॉड) आल्यास बँक कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार नसेल. परंतु नैसर्गिक संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी बँकांनी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी सुरक्षित लॉकर आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे बँकांचीच राहील. आग, चोरी, डाका किंवा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक आपल्या उत्तरदायित्वापासून मागे हटू शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये बँकेचे उत्तरदायित्व लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभर पटीपर्यंत असेल. त्याशिवाय, लॉकर भाड्याने घेणार्या व्यक्तीने कोणत्याही धोकादायक किंवा बेकायदेशीर वस्तू ठेवू नये यासंदर्भात बँकांनी लॉकर करारात एक तरतूद करावी.
लॉकरची यादी द्यावी लागेल
बँकांना शाखावार रिकाम्या लॉकरची यादी बनवावी लागणार आहे. तसेच लॉकर वाटप करण्याच्या उद्देशाने बँकांच्या प्रतीक्षा यादीची माहिती कोअर बँकिंग प्रणाली (सीबीएस) किंवा सायबर सुरक्षा यंत्रणेच्या कोणत्याही संगणक प्रणालीमध्ये समाविष्ट करावी लागेल. लॉकरच्या वाटपामध्ये बँकांना पारदर्शकता सुनिश्चित करावी लागेल.
प्रतीक्षा यादीचा क्रमांक जाहीर होणार
आरबीआयच्या दिशानिर्देशांनुसार, बँकांना लॉकर वाटपामध्ये सर्व अर्जांसाठी पावती देणे आवश्यक आहे. लॉकर उपलब्ध नसेल तर ग्राहकांना प्रतीक्षा यादी क्रमांक बँकांना द्यावा लागणार आहे. हे संशोधित दिशानिर्देश एक जानेवारी २०२२ मध्ये लागू होणार आहेत.