निलेश गौतम, सटाणा
बागलाणच्या पश्चिम भागात काल झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ कांदा, टोमॅटो,मिरची, बाजरी, व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने आज या भागातील शेतकरी मोठा हवालदिल झालेला दिसून आला. दरम्यान आज या नुकसानग्रस्त भागाची पाहणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या कडून पाहणी करण्यात आली तर दुपारी प्रांत अधिकारी बबन काकडे यांनी ही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
यादरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी उपस्थित तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, यांना सूचना करत या भागातील शेत पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. तर तहसीलदार व प्रांत यांच्याबरोबर तात्काळ बैठक घेऊन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यासाठी आजच बैठक घेत असल्याचे आमदार बोरसे यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला सांगितले यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा, बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे ,,उपसरपंच दिपक सोनवणे, हे उपस्थित होते. तर नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी माजी आमदार संजय चव्हाण यांनीही केली.
यावेळी चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून शेतकऱ्यांना या सरकारने किमान दीड लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी केली असल्याचे सांगत राज्याची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना याबाबत आपण सविस्तर माहिती दिली असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, माजी नगरसेवक छोटू (मनोज)सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, आदी उपस्थित होते.
Baglan Hailstorm Crop Loss MLA Visit