मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील काही शहरांची नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबई ही मायानगरी नव्हे माधवनगरी असल्याचे सांगत या शहराच्याही नामांतराची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाले. या पार्श्वभूमीवर आता अहमदनगरचेही नामांतर करण्याची मागणी होऊ लागली आहे. नामांतराचे वारे राज्यात आता घुमत असले तरी २०१४ पासूनच दिल्ली आणि देशातील इतर राज्यांमध्ये विविध शहरे, रस्ते यांचे नाव बदलविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांची नावे आपण का ठेवावीत असा युक्तिवाद यामागे करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिव्य दरबारमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबई ही मायानगरी नव्हे तर माधवनगरी असल्याचे म्हटले आहे. ते दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या या वक्तव्याने आता मुंबईचे नाव बदलणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नेमके काय होत वक्तव्य?
‘मुंबईतील येड्यांनो तुम्ही म्हणता ही मायानगरी आहे, पण आता मी म्हणतो मायानगरीला माधवनगरी बनवायचं आहे. तुम्ही माया खूप जमा केली, आता बागेश्वर धामसोबत माधवलाही सोबत घेऊया,’ असे आवाहनही बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. तसेच, ‘मी आव्हानांना घाबरत नाही. मी जर महाराष्ट्रात आलो नसतो तर विरोधकांना जिंकल्याचा आनंद झाला असता,’ असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपण कुणालाही घाबरत नसल्याचे म्हटले.
Bageshwar Baba Mumbai Name Change New Controversy